श्रीनाथभक्त परम पूज्य श्रीनाथजी दिगंबरदास घारे महाराज

श्रीनाथभक्त परम पूज्य श्रीनाथजी दिगंबरदास घारे महाराज यांचा जन्म १ जानेवारी १९६० साली पुण्यातील डेक्कन येथे कृष्णराव व राधाबाई घारे यांच्या पोटी झाला. महाराजांचे आई वडील महादेवांचे व शिव गोरक्षनाथांचे निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे ३ वाजता ऊठून ते उपासना करीत असत. या उपासनेचा महाराजांवर मोठा प्रभाव झाला. घरच्या परिस्थीती मुळे महाराजांचे जिवन लहानपणी फार कष्टात गेले. लहानपणापासूनच त्यांना एकतारी भजने ऐकण्याची हौस व आवड होती. एकतारी भजनांमुळेच त्यांचा कल आध्यात्माकडे वळाला.

श्रीक्षेत्र त्रीपुटी येथे संजीवन समाधीस्त श्रीसद्गुरूनाथ परब्रम्ह गोपालनाथ महाराज यांच्या मठामध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांचा अनुग्रह झाला. अनुग्रहानंतर त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला व आध्यात्मिक अभ्यासाला सुरूवात झाली.

ईश्वराच्या प्राप्तीसाठी समाजात जे कर्मकांड केले जाते, त्याचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. उदा. पूजा, अर्चा, होम-हवन, उपवास, व्रते इत्यादी. निरनिराळ्या मंदिरांमध्ये जाऊन तेथील मूर्ती पाहून चिंतन केले. लोक देव शोधण्यासाठी तीर्थक्षेत्री जातात त्या तीर्थक्षेत्रांचा तेथील परीसराचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. ईश्वरप्राप्तीसाठी नेमके साधन काय? नेमका मार्ग कोणता? यावर ते रात्रंदिवस विचारमंथन करू लागले. परमेश्वरापर्यंत पोहोचायचे असेल तर कोणत्याही कर्मकांडाने निश्चितच पोहोचता येत नाही. सद्गुरूंनी दिलेले सतनाम हेच मनुष्याला ईश्वरापर्यंत पोहोचवते हे त्यांनी अनुभवले.

सतत २१ वर्षे त्यांनी नामसाधनेचा आभ्यास केला आणि स्वस्वरूपाला प्राप्त केले. देहातील देवाचे दर्शन घडल्यानंतर समाजाला या ज्ञानाची किती गरज आहे हे त्यांनी जाणले. मानवसमाजाला सत्य ईश्वरापर्यंत कसे पोहोचवायचे यासाठी ते धडपड करू लागले. प्रत्येक जीवाला सत्य ज्ञानापर्यत किंवा खर्‍या ईश्वरापर्यंत कसे पोहोचवायचे हिच तळमळ त्यांना लागून राहिली. १९९३ साली त्यांचा विवाह झाला. संसार करून परमार्थ कसा साधायचा याचे उत्तम उदाहरण त्यांनी जगाला दिले.

अखेर जनजागृतीचे कार्य त्यांनी हाती घेतले व बुधवार दिनांक २२ डिसेंबर १९९९ (दत्तजयंती) या दिवशी त्यांनी नामदानाला सुरूवात केली. एका नवीन आध्यात्मिक क्रांतीची त्यांनी सुरूवात केली. देहाच्या आतील देव बघायचा असेल तर देहाच्या आतच गेले पाहिजे आणि आत जायचे असेल तर गुरूनामाशिवाय दुसरा मार्गच नाही. गुरूनामाचे ध्यान केल्याने आतील देवाचे दर्शन होते हे ज्ञान देण्यास त्यांनी सुरूवात केली. '' देह आहे मठ, तो बघ नीट, स्वस्वरूपी होई दंग तोच खरा सत्संग.'' हे परिवाराचे घोषवाक्य त्यांनी तयार केले. ''आम्ही ध्यान करतो, तुम्ही ध्यान करा.'' ''ध्यानात घ्या ध्यानावर या आणि मग ध्यान करा.'' हि शिकवण त्यांनी साधकांना दिली. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामधील क्रियायोग, ध्यान, अभ्यास, गुढज्ञान, गुरूनामाने सर्वना मिळावे व सच्चिदानंदाची सर्वांना प्राप्ती व्हावी यासाठी सुलभ सोपी व कमी कालावधीत जास्तीत जास्त साध्य करून देणारी साधना त्यांनी रचली व विश्वासाठी उघड केली.

देव शोधायचा असेल तर तो आपल्या देहात शोधा बाहेर तो सापडणार नाही हे त्यांनी सर्वांना शिकवले. त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले उदा. दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवतगीता, एकनाथी भागवत, ग्रामगीता, गुरूचरित्र, कबीरांचे दोहे, पदे, एकतारीभजने ईत्यादीचा परिपूर्ण अभ्यास केला. सद्गुरूनाथ परब्रम्ह गोपालनाथ महाराज लिखीत ''वेदांत शिरोमणी'' या ग्रंथाचा त्यांनी निरंतर अभ्यास केला.

महाराजांनी २००० साली ''ओम जय हो विश्वात्मका परिवाराची'' स्थापना केली. या परिवारात अनेक जीवांना नामदान देऊन त्यांच्या जिवन ऊध्दारण्याचे कार्य सूरू झाले. महाराजांच्या प्रखर वाणीतील वाक्यांनमुळे माणसातला आत्मविश्वास जागा होऊ लागला. असंख्य लोक सतनाम घेऊन दुःखमुक्त होऊ लागले. हळूहळू छोट्या परिवाराचे रूपांतर मोठ्या परिवारात जाहले. २००९ साली त्यांनी त्यांच्या शेतजमीनी मध्ये ''श्री भगवान अवधूत एकमुखी दत्तमुर्ती'' स्थापनेचे कार्य हाती घेतले आहे. २०१२ साली महाराजांच्या ''गुरूमुखवाणी'' या ग्रंथाचे प्रकाशन झाले.

श्रीनाथभक्त परम पूज्य श्रीनाथजी दिगंबरदास घारे महाराज अनेक संतांचा अदर्श समोर ठेऊन श्री सद्गुरूनाथ परब्रम्ह गोपालनाथ महाराज यांच्या सत्य मार्गवर चालत आहेत.