
श्री सद्गुरूनाथ परब्रम्ह गोपालनाथ महाराज यांचा जन्म नगर जिल्ह्यातील सलाबतपूर या गावी झाला. जन्मतिथी (शके १६१२) श्रावण वद्य अष्टमी, गोकुळाष्टमी बुधवार, रोहिणी नक्षत्र श्रीकृष्ण जन्मचीच वेळ. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदपंत व आईचे नाव आनंदीबाई घोलप होय. जन्मतःच गोपालनाथा महाराजांच्या शरीरावर बम्हा, विष्णू व महेश यांची चिन्हाकृती होती. त्यांच्या डोक्यावर दिव्य असे शिवलिंग आहे. अल्पवयातच तपश्चर्येसाठी त्यांनी घर सोडले. 'पयोष्णी' नदिच्या तीरावर रामतीर्थ स्थानी श्रीगुरू दत्तात्रयांचे त्यांना दर्शन झाले. खान्देशातील 'सिउर बार पाडी' या गावी श्रीरंगनाथ स्वामिंकडून त्यांना अनुग्रह जाहला. गुरूगृही राहून त्यांनी ब्रम्हज्ञानप्रप्ती केली. अनेक ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक मठामध्ये असंख्य शिष्यगण तयार होऊ लागले. अनेक शिष्यांना त्यांनी आत्मोध्दाराचा मार्ग दिला. त्याच बरोबर वेळ पडेल तेंव्हा असंख चमत्कारही केले. शिवा नावाच्या एका पांगळ्या शिष्याला नाथकृपेने चालता येऊ लागले. गणेजी भोसले यांच्या मृत झालेल्या पुत्रास म्हणजेच मानाजी भोसले यास गोपालनाथांनी जीवंत केले.
हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी मठस्थापना केली. भ्रमण करत असताना गोपालनाथा हे संत एकनाथ महाराजांच्या समाधिवर पादत्राणे घालून बसले त्यांच्या या विचित्र लिलेने ते एकनाथ महाराजांचाच अवतार आहे हे सिध्द होते. संत एकनाथ महाराज यांच्या आरतीची रचना परब्रम्ह गोपालनाथांनी केली. सातारर्या जवळच जरंडेश्वर या डोंगरावर त्यांनी तपश्चर्या केली. कठिण असे अनुष्ठान केले. पाठखळ येथे तापलेल्या गारगोट्यांवर अनुष्ठानही केले. गोपालनाथ महाराज हे साक्षात परब्रम्ह आहेत. शिव गोरक्षनाथांचाच दुसरा अवतार म्हणजे गोपालनाथ महाराज आहेत.
सातारा शहरातील शाहूराजांनाही मंत्रदिक्षा देऊन ब्रम्हज्ञानाच्या मार्गाला लावले. एका प्रसंगी नाथांनी विशाल सिंहरूप धारण केले. अशी अनेक रूपे त्यांनी वेळप्रसंगी घेतली. त्यानी त्यांचे शिष्य परमहंस यांना विश्वरूप दाखवले. हे फक्त परब्रम्ह अवतारालाच शक्य आहे.
ज्या ज्या गावी गोपालनाथ महाराज जत असत त्या त्या ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले. तेथे त्यांच्या शिष्य समुदायात विविध जातीच्या लोकांचा एकत्र समावेश असे. उंबरज गावा जवळील कोरटी गावी श्री एकनाथ षष्ठीचा उत्सव गोपालनाथांनी सुरू केला. गोपालनाथांच्या प्रत्येक पुण्यतिथिला आजही भोसलेवाडी (कोरटी) येथील भगवा ध्वज त्रिपुटीस यतो आणि नंतर पालखीसोहळ्याला सुरूवात होते. दौलताबाद येथिल होनसिंग हजारी हे शूर रजपूत नाथांचे भक्त होय. त्यांचे वंशज आजही पुण्यतिथिला भगवा ध्वज घेऊन येतात व पालखीचे रक्षक म्हणून काम करतात.
ज्ञानाबरोबरच नाथांनी अनेक लोकांना दुःखातून मुक्त केले. यज्ञात होणारर्या पशूहत्या गोपालनाथांना कधीही आवडल्या नाही. पशूहत्या या कुप्रथेला विरोध करून ती प्रथा त्यांनी बंद केली. यज्ञाच्या वेळी आहूती म्हणून जे मांस यज्ञास अर्पण केले जायचे असे यज्ञ त्यांनी बंद पाडले.
नाथांवरती अनन्यभक्ती करणारर्या भक्तांना मरणसमयी दर्शन देवून त्यांनी मुक्त केले. ज्या ज्या मठात नाथ रहायचे तेथे चैतन्य भरून जात असे. त्यांच्या भक्तमंडळीं मध्ये साधू-संत, राजे, सरदार तसेच कवी, लेखक अशा हरप्रकारच्या भक्तांचा आनंदाने सहभाग होता. सामान्य जनांचा असंख्य समुदाय नाथांकडे येत असे. भक्तमंडळीं मध्ये माता भगीनींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यातील यमुनाबाई नावाच्या एका भक्त महीलेने एकदिवस नाथांकडे विश्वरूप दाखवा असा हट्टच धरला तो हट्ट पुरवण्याकरीता नाथांनी सात दिवस योग समाधी लावली. पण समाधि अवस्था न समजल्याने भक्तांना वाटले की नाथांचे अवतार कार्य संपूर्ण जाहले म्हणून त्यांनी नाथांच्या पूढच्या संस्काराला सुरूवात केली. परंतू योगसमाधी संपूर्ण झाल्यावर नाथांनी सर्व दृष्य पाहीले व त्याक्षणी त्यांनी त्रिपुटी येथील मठात संजीवन समाधी घेतली. यावरूनच दिसते की ईश्वरअवताराची पंचतत्वावर सत्त कशी आहे. तो दिवस श्रावण वद्य अमावस्या शुक्रवार शके १६८८ होय. त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आले. त्या संजीवन समाधिच्या दुसरर्या पायरीवरून अखंड पाणी येत असते.
श्री क्षेत्र त्रिपुटी येथे ब्रम्हेंद्रस्वामी या थोर पुरूषाने सुंदर असा मोठा तलाव नाथांसाठी बांधून दिला. या तलावास गोपालसरोवर असे नाव आहे. त्या तलावास बाराही महिने भरपूर पाणी असते. या तलावाचे पाणी कधीही आटत नाही.
सद्गुरू परब्रम्ह गोपालनाथांची संजीवन समाधी त्रिपुटी येथे आहे. तसेच त्यांच्या प्रतीक समाध्यांची स्थाने अनेक ठिकाणी आहेत. जेथे जेथे त्यांनी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी त्यांची आसने अहेत व त्या सर्व ठिकाणी आजही उत्सव साजरे केले जातात. नाथसाहेबांबरोबरच नाथशिष्यांचीही अनेक स्थाने आहेत. तेथे शिष्यांच्या नावे मठ आहेत.

सद्गुरू परब्रम्ह गोपालनाथांनी वेदांत शिरोमणी हा ९२०९ ओव्यांचा महान ग्रंथ रचला या ग्रंथामध्ये माया व ब्रम्ह यांचे निरूपण केले आहे. त्याच बरोबर दयासिंधू, समाधीबोध, गोपालनाथगाथा, गुरूगिता टिका, देहावरील निराकारी भजने अशा अनेक रचना त्यांनी केल्या. नाथांच्या शिष्यांनी नाथांवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. तसेच नाथांच्या आरत्यांचीही रचना केली आहे. अनेक भजने लिहीली आहेत. नाथांवर रचलेली श्रीनाथस्तुती सुमनांजली आजही घरोघरी नित्य वाचनात आहे. वेड्यांच्या मुखी वेद वदवून घेण्याचे सामर्थ्य नाथांकडे आहे. साक्षात परब्रम्हाच्या या अवताराने जगाला परब्रम्हा पर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अतिशय सुलभ करून दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर कितीतरी अज्ञानांचे अज्ञान नाहिसे झाले व ते गुरूपदाला पोहोचले. कलियुगाला सतनामाचा सुलभ मार्ग दिला. त्यांनी दिलेल्या नामाने ब्रम्ह सत्य जगत् मिथ्या याचा साक्षात्कार होतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानेच पापमुक्ती होते. त्यांच्या चरणी दृढ भाव असलेल्या भक्तांना ते आजही दर्शन देवून कृतार्थ करतात.
संसारी जनांना तारण्याचा मार्ग देवून आनाथांचे ते सदैव नाथ बनून राहिले. श्रीनाथांचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्हाचेच दर्शन होय. परमतेजस्वी अशा सदगुरू नाथांनी 'निजवस्तूचे ज्ञान' भक्तांना सुलभ करून दिले. अशा परम पुज्य सद्गुरू परब्रम्हास आमचे शतशः प्रणाम.